
दिल्ली ते वॉशिंग्टन डीसीला जाणारी एअर इंडियाच्या विमानांची उड्डाणे येत्या 1 सप्टेंबरपासून बंद केली जाणार आहेत. ऑपरेशनल आव्हानांमुळे एअर इंडिया कंपनीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाच्या विमान ताफ्यात घट झाली आहे. गेल्या महिन्यात एअर इंडियाने 26 बोइंग 787-8 विमानांना रेट्रोफिटिंग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा व्हावी यासाठी हा नवीन कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे 2026 च्या अखेरीपर्यंत अनेक विमाने उपलब्ध होणार नाहीत. तसेच पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्याने लांब पल्ल्याच्या उड्डाणांवर परिणाम होत आहेत. उड्डाण मार्ग लांब होत असून ऑपरेशनल गुंतागुंत वाढली आहे. ज्या प्रवाशांनी 1 सप्टेंबरनंतर वॉशिंग्टन डीसीला जाण्यासाठी तिकीट बुकिंग केले असेल अशा सर्व प्रवाशांशी संपर्क साधला जाईल. त्यांना त्यांच्या आवडीनुसार, फ्लाईट्समध्ये बुकिंग करणे किंवा पूर्ण रिफंड देण्यासारखा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.
एअर इंडियाच्या प्रवाशांना एअर इंडियाच्या इंटरलाइन पार्टनर एअरलाइन्स – अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअर लाइन्स – या चार यूएस गेटवे – न्यूयॉर्क (जेएफके), नेवार्क (ईडब्ल्यूआर), शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्कोद्वारे वन-स्टॉप फ्लाइटद्वारे वॉशिंग्टन डीसीला प्रवास करता येईल. या प्रवाशांना एकाच तिकिटावर प्रवास करता येईल. तसेच त्यांचे सामान वॉशिंग्टनला पोहोचवले जाईल.


























































