
वन विभागाच्या अखत्यारीतील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आजरा तालुक्यातील विविध संघटना, पक्ष यांनी वारंवार निवेदने देऊनही वन विभागाने दखल घेतली नाही. नुकसानग्रस्तांनी या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते, संघटना आणि शेतकऱ्यांसह आजरा येथील छत्रपती संभाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी परीक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांनी येत्या पंधरा दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत वारंवार आवाज उठवूनही वन विभाग दखल घेत नाही. गेल्या आठवडय़ात एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करून वन विभागाने सत्ताधाऱ्यांसोबत काम करीत असल्याचे स्पष्ट केले. खरतर ज्या-ज्या संघटना, पक्ष यांनी निवेदने देऊन मागणी केली, त्या सर्वांसोबत बैठक घेऊन चर्चा केली असती तर अनेक प्रश्न सुटले असते. मात्र, वन विभागाने सरकारी नोकर आहोत, जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आम्हाला देणं-घेणं नाही, हेच कृतीतून स्पष्ट केल्याचा आरोप या आंदोलनादरम्यान करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी संभाजी चौकात संकेश्वर-बांदा महामार्गावर ठिय्या मारून ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस प्रशासनाने ‘रास्ता रोको’ करण्यास मज्जाव केल्यामुळे चौकातच महामार्गालगत आंदोलकांनी ठिय्या मारला. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, कॉ. धोंडीबा कुंभार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख युवराज पोवार, राजू होलम, कारखान्याचे संचालक हरीबा कांबळे, कॉ. संजय तर्डेकर यांनी वन विभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली.
कित्येक महिने शेतकरी नुकसानीबाबत लढा देत असताना, केवळ सत्ताधाऱ्यांना बोलावून बैठका घेतल्या जात आहेत. यातून शेतकऱ्यांचे प्रश्न किती सुटले, असा सवालही करण्यात आला.
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष आनंदा घंटे, काशिनाथ मोरे, दिनेश कांबळे, संजय येसादे, गंगाराम डेळेकर, प्रकाश मोरुस्कर, कॉ. शांताराम पाटील, रामचंद्र पाटील, जोतिबा चाळके, सुनील डोंगरे, डॉ. धनाजी राणे, सूर्यकांत दोरूगडे, शिवाजी आडाव, संजय सांबरेकर, रंगराव माडभगत, आनंदा कुंभार, तुळसाप्पा पोवार, आदी विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले


























































