
निधी वितरणात सत्ताधाऱ्यांवर निधीची खैरात करीत विरोधकांवर अन्याय सुरूच ठेवला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना पाच कोटींचा निधी दिला आहे आणि मराठी माणसांचे प्राबल्य असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघाला फक्त दोन कोटी रुपयांचा निधी वितरित करून महायुती सरकारने मराठी माणसांवर अन्याय केला आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुंबई शहराचे पालक मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षातील आमदारांना अपुरा निधी दिली जात असल्याचे उपमुख्यमंत्री व मुंबई शहराचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. आपले विचार वेगळे असतील, पण सत्तेवर असताना समान हित असले पाहिजे. आपण निधी वितरणात अन्याय केला तर नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर निधी वितरणात अन्याय होणार नाही. पुरेसा निधी दिला जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी अजय चौधरी यांना दिले होते. पण या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही.
त्यामुळे शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांना स्मरणपत्र पाठवले आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये दिलेल्या आश्वासनाची आठवण त्यांनी एकनाथ शिंदे यांना करून दिली आहे. शिवडी विधानसभेत बहुसंख्य मराठी पुटुंबे आहेत. शिवडी-लालबाग-परळ हा परिसर मराठी माणसाचा असून नागरिकांना निधीअभावी वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी शिंदेंना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
निधी वितरणातील असमानतेबाबत आपण पेंद्रीय नियोजन समितीला लवकरच पत्र पाठवणार आहे. इतर आमदारांप्रमाणे आमच्या मतदारसंघालाही पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात यावेत. – अजय चौधरी
शिवसेनेचे शस्त्रागार
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच म्हणत की, लालबाग-परळ हा शिवसेनेचे शस्त्रागार आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान व हित जपण्याचे काम आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांनी केले याची आठवण यानिमित्ताने अजय चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांना करून दिली आहे.
























































