दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची ‘एनओसी’ बंधनकारक

राज्यात ‘एफएल–2’ आणि ‘सीएल–3’ परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची ‘एनओसी’ बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी-रहाटणी परिसरात सह्याद्री सहकारी हाऊसिंग सोसायटीमध्ये पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या व्यापारी गाडय़ांमध्ये कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूटसाठी ना हरकत घेऊन तेथे ‘विक्रांत वाइन शॉप’ दुकान सुरू करणे, तसेच शिवतीर्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये संस्थेच्या गेटजवळ ‘बजाज देशी दारू दुकान’ सुरू केल्याने नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीसंदर्भात आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर अजित पवार यांनी सभागृहात दारू दुकानासंदर्भात धोरण स्पष्ट केले.

पवार म्हणाले, संबंधित दुकान सोसायटी परिसरात असेल तर सोसायटीची संमती नसल्यास स्थलांतरास कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. ‘एफएल-2’ आणि ‘सीएल-3’ परवान्यांबाबत ही अट आता काटेकोरपणे लागू राहील. पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी आणि रहाटणीतील दोन अनधिकृत दारू दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यापैकी एक प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, तर एका दुकानावर यापूर्वी 50 हजार रुपये दंड आकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.