अजितदादांचे तो मी नव्हेच… शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते! कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा अकोला, अमरावती आणि बुलढाण्यात ट्रॅक्टर मोर्चा

महायुतीच्या जाहीरनाम्यातच विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा वादा केला होता; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नव्हते, असे स्पष्टीकरण अजितदादा यांनी आज दिले.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यासंदर्भात महायुती सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. याकडे कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले. यावर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी दिलेले नाही, असे म्हणत अजितदादांनी हात वर केले. त्यांच्या या विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याने आता लवकरच कर्जमाफी करण्यात येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अजित पवार यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेने शुक्रवारी अकोला, अमरावती, बुलढाण्यात ट्रक्टर मोर्चांद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक दिली. अमरावतीत शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, बुलढाण्यात प्रवक्ता जयश्री शेळके, अकोल्यात आमदार नितीन देशमुख यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. डोक्याला भगवे पटके बांधून आणि हाती भगवे झेंडे घेऊन हजारो शेतकरी, त्यांचे कुटुंबीय आणि शिवसैनिक रणरणत्या उन्हात या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीने संयुक्त जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याची घोषणा फडणवीस, अजितदादा आणि शिंदेंनी केली होती.

बळीराजाच्या मागण्या…

  • शेतमालाला योग्य भाव द्या
  • सरसकट पीक विमा द्या
  • रखडलेले सिंचन अनुदान द्या
  • वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण
  • वीज बिल माफ करा
  • शेतीसाठी मोफत वीज द्या