मिंध्यांचे आमदार थोरवे कर्जतचा वाल्मिक कराड, ..तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही; अजित पवार गटाच्या सुधाकर घारे यांचा हल्ला

रायगड जिल्ह्यात मिंधे आणि अजित पवार गट यांच्यात रोजच वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. निवडणुकीत अजित पवार गटाशी युती करणार नाही, असे ऐलान मिंधे गटाचे अलिबागमधील आमदार महेंद्र दळवी यांनी केले असतानाच आता कर्जतमधील मिंध्यांचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी हल्लाबोल केला आहे. थोरवे म्हणजे कर्जतचा वाल्मिक कराड असून स्टेशन डायरी उघडली तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा शब्दांत घारे यांनी आगपाखड केली आहे.

अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मिंधे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांनी सांगितले की, खालापूर, खोपोली, कर्जत, माथेरान, नेरळ या पोलीस ठाण्यांच्या स्टेशन डायरीमधील गोपनीय माहिती आपण स्वतः बाहेर काढली आहे. थोरवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून पोलिसांवर दबाव टाकला असल्याचा आरोप घारे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, कर्जत तालुक्यात महेंद्र थोरवे यांच्या रूपाने वाल्मिक कराड तयार झाले असून ते दहशत माजवण्याचे काम करीत आहेत.

मंजूर केलेला निधीही वळवला
पळसदरी धरणामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाची चौकशी का थांबली, असा सवाल सुधाकर घारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. कर्जत तालुक्यातील दरडग्रस्त घोषित झालेल्या सांगवी गावासाठी मंजूर केलेला निधीदेखील वळवण्याचा प्रयत्न थोरवे यांनी केला असून तिथे एखादी घटना घडल्यास त्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी, असेही घारे यांनी स्पष्ट केले.