अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातल्याच रुपाली ठोंबरे नाराज असल्याची चर्चा होती. आता यावर रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांनी विधानं केली असून दोन्ही महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसले.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की वाद घालणं आमच्या रक्तात नाही आणि आमच्या संघटनेचा तो अजेंडाही नाही. कुणी वक्तव्य करत असेल तर ते मी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. गेली तीन वर्ष राज्यातील महिला भगिनींसाठी मी काम केलं त्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. एखादी व्यक्ती जर बोलत असेल तर ते माझ्यासाठी महत्त्वाचे नाही असेही चाकणकर म्हणाल्या.
महिला आयोगाचे अध्यक्षपद हवे अशी मी कधीच मागणी केली नव्हती असे स्पष्टीकरण रुपाठी ठोंबरे यांनी केले होते. तसेच मी सभागृहातली नेता आहे, लोकांमधून निवडून येण्याचं माझ्यात कौशल्य आहे. रुपाली चाकणकर यांनी गैरसमज करून घेतला आहे तो त्यांनी काढून टाकावा. रुपाली चाकणकर म्हणाल्या की मी नवीन पक्षात आल्या आहेत. पण ध्येय धोरणं, निवडून येण्याची रणनीती, सर्वांना एकत्र घेऊन पुढे नेण्याचे गुण आमच्याकडे आहेत. त्यामुळे मागे एक समोर एक बोलण्याऐवजी समोरासमोर चर्चा करावी की रुपाली चाकणकरांना माझी काय अडचण आहे असेही ठोंबरे म्हणाल्या.