दादांकडे भाजपच्या घोटाळ्यांची फाईल होती, न्यायालयीन चौकशीची राज्यसभेत संजय राऊत यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘विमान दुर्घटनेत मृत्यू झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्यांची फाइल होती. त्यांनी स्वतः तसे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू रहस्यमय असून त्याची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या कारभारावर तोफ डागली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निधनाचा मुद्दा उपस्थित करत त्याबद्दल संशय व्यक्त केला. ‘अजित पवारांवर भाजपने 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र, नंतर भाजपने त्यांना पवित्र करून सत्तेत सोबत घेतले याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले. ‘अजित पवार यांचा अपघात पाहून मला न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची आठवण झाली. अजितदादांच्या बाबतीतही तसं काही झालं नाही ना, अशी शंका संजय राऊत यांनी बोलून दाखवली.

कुठे आहे न्यायव्यवस्था?

केंद्रातील सरकार पाखंडी व बेजबाबदार आहे. या देशात लोकशाही, न्यायव्यवस्था शिल्लकच राहिलेली नाही. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सरकारच्या हातचे बाहुले झाले आहे. निवडणूक आयोग हा भाजपाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनला आहे, अशी सणसणीत टीका संजय राऊत यांनी केली. सोनम वांगचुक हे कुठे आहेत, ते जिवंत तरी आहेत का? चीनने आपली जमीन बळकावली हे ते सरकारला सांगत होते. हे सांगणे म्हणजे गुन्हा आहे काय, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

बारामतीला जातानाही फाइल सोबत होती!

सिंचन घोटाळय़ात भाजपने मजबूत पैसे खाल्ले आहेत. त्यांची फाईल माझ्याकडे आहे, असे अजित पवार 15 जानेवारी रोजी म्हणाले होते. त्यानंतर दहा दिवसांतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. हा आरोप नाही, पण हे सगळे रहस्यमय आहे. भाजपच्या घोटाळ्यांची फाइल अजित पवार नेहमी सोबत ठेवायचे. मुंबईहून ते बारामतीसाठी निघाले तेव्हाही ती फाईल त्यांच्याकडे होती. अर्ध्या तासातच त्यांचा भयानक मृत्यू झाला. या मृत्यूची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.