
अजित पवार हे जितक्या कडक शिस्तीचे नेते होते, तितकेच ते मिश्किल आणि दिलखुलास होते. जाहीर सभांमध्ये किंवा वैयक्तिक भेटीत ते अनेकदा मनमोकळे बोलत. कठोर शब्दांत बोलून मग सांभाळूनही घेत. त्यांचा हा अंदाज राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत असे.
z शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत गेल्यानंतर ते सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा हा मिश्किल अंदाज पाहायला मिळाला. पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना शपथ कधी घेणार, असा प्रश्न विचारला. शिंदे उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते. संध्याकाळपर्यंत थांबा म्हणत होते. तेवढय़ात त्यांना मध्येच तोडत अजित पवार म्हणाले, ‘त्यांचं संध्याकाळी ठरेल, पण मी तर उद्याच शपथ घेणार आहे.’ त्यांच्या या वक्तव्यावर सगळेच हास्यकल्लोळात बुडून गेले.
z पुण्यातील एका कार्यक्रमात रोहित पवारांनी अजितदादांना भावकीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. त्यावर अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली होती. ‘भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जयंतराव, त्याला विचारा, किती मतं पडलीत? पोस्टल बॅलटवर निवडून आलाय आपण.
z लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये केलेल्या भाषणात अजित पवारांनी बजरंग सोनावणे यांना जोरदार टोले हाणले. ‘मला येऊन सांगायचा, छाती फाडली की तुम्ही दिसाल. ही दिसेल, ती दिसेल. अरे छाती फाडल्यावर मरून जाशील, कशाला उगा गप्पा हाणायच्या? हनुमानानं फाडलेली छाती वेगळी. तू पुठं बजरंगा, तू स्वतःला हनुमान समजायला लागला का?
z लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवानंतर विधानसभा प्रचारासाठी अजितदादांनी बारामतीत सभा घेतली. त्यावेळी लोकांना प्रेमळ शब्दांत दमबाजी केली. ‘लोकसभेसारखा दणका मला दिऊ नका. लय वंगाळ वाटतं एवढं काम करून. बेंबीच्या देठापास्नं सांगतोय, घाम येतोय. पटवून देतोय. समोरच्यांनी काय दिलं, देवळात वाजवायची घंटा दिली का? मला काय कळतच नाय.
z आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व अशा शब्दांत एका कार्यक्रमात सूत्रसंचालकाने जयंत पाटील यांचं कौतुक केलं. त्यावर अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. ‘आम्ही काय देखणे न्हाय काय. वाळव्याला बोलवायचं. इथं बोलवायचं आणि बिनपाण्यानं करायची. जयंत पाटील देखणे आणि मी काय बिनदेखणा हाय का? तू भेट मला, बघतोच तुला.
सूत्रांना एखादा जीवनगौरव पुरस्कार देऊन टाका…
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र राज्याच्या तिजोरीवर ताण पडतो म्हणून कर्जमाफी देऊ शकत नाही, अशी भूमिका अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतल्याची बातमी समोर आली होती. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना ‘हे सूत्र मला एकदा पाहायचेच आहेत, मी म्हणतो सूत्रांना एखादा जीवन गौरव पुरस्कार देऊनच टाका. हे सूत्र माझ्या हातात सापडू द्या, त्याचा पुरेपूर बंदोबस्त करतो. कर्जमाफी देऊ नका असं मी कधीच म्हणणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, मला जे बोलायचं ते मी बोलतोच. त्यासाठी सूत्र कशाला पाहिजे,’ असा संताप अजितदादांनी व्यक्त केला होता.
घरी जाऊन बायकोला लव यू म्हण…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र.2 मध्ये दादांच्या भाषणावेळी मजेशीर किस्सा घडला. भाषणावेळी एक कार्यकर्ता अचानकच दादांना ‘लव यू दादा’ असे मोठय़ाने म्हणाला. याला तत्काळ उत्तर देत ते म्हणाले, ‘घडय़ाळाचं बटण दाब, ते लव्ह यू राहू दे बाजूला… घरी जाऊन बायकोला म्हण आय लव्ह यू… बायको म्हणेल गडी आज लयच बिघडलाय..!’ अशी टोलेबाजी केली. दादांचा हा हजरजबाबीपणा पाहून कार्यकर्तेही चांगलेच हसू लागले.
माझं टक्कल पडलंय, तरी हे लोक मलाच शिकवतात
राजगुरूनगरमध्ये सभा सुरू असताना बाबा राक्षे हे अजित पवार यांच्याजवळ व्यासपीठावर गेले आणि त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजित पवार मिश्किलपणे म्हणाले, “होय होय बाबा होय. आता हा मला शिकवायला चाललाय, आता असं बोला, आता तसं बोला. माझं पार टक्कल पडलंय तरी लोक मला शिकवतायेत. आता काय करू या बाबाला. बाबा लोपं अशीच असतात. सगळे बाबा लोकांचं ऐकावं लागते. आता पुठल्या बाबा लोकांचे ऐकावे लागते, याचा विचार तुम्ही करा,’’ असे अजितदादा मिश्कीलपणे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
नंतर भेट… सांगतो
बारामती येथे सर्वात उंच ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळय़ादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले. यावेळी एका कार्यकर्त्याने पाठीमागून टिप्पणी केली, ‘दादा, पुन्हा सांगा, ऐकायला आलं नाही.’ यावर अजितदादांनी आपल्या नेहमीच्या बेधडक अंदाजात प्रत्युत्तर दिले, ‘नंतर भेट, सांगतो. तुला ऐकायला आलं नसेल तर दिलगिरी व्यक्त करतो!’ या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि दादांच्या खुमासदार शैलीचे काwतुक झाले.
बिबटे नव्हे, आधी गावकरीच शेळय़ा खातील…
राज्यात बिबटय़ांचा हैदोस सुरू असताना वनमंत्री गणेश नाईकांनी त्यावर एक कोटी रुपयांच्या शेळ्या जंगलात सोडण्याचा पर्याय सुचवला. त्यावर जंगलात शेळ्या सोडल्यास बिबटे खाण्याऐवजी आधी गावकरीच त्या बकऱ्यांवर ताव मारतील, असा मिश्किल टोला अजितदादांनी वनमंत्र्यांना लगावला होता.





























































