
अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ भिरकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे तत्कालीन युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून लातूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे समर्थक अजित पवारांच्या गटावर संतापले आहेत.
श्रीगोंदा येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना कांद्यावर बोलण्याची मागणी करण्यात आली होती. अजित पवारांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने हातातील माळ गरागरा फिरवत अजित पवारांकडे भिरकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच तेथील एकाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला रोखले. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.