
‘माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीप्रकरणी नेमलेल्या ‘झोटिंग कमिशन’चा अहवाल आमच्यापर्यंत आलाच नाही. मग त्यामध्ये एकनाथ खडसे यांच्यावर ठपका आहे, असे तुम्हाला कोणी सांगितले?’ असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ‘यासंदर्भात पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेले वक्तव्य आजही रेकॉर्डवर आहे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ‘झोटिंग कमिशन’च्या चौकशी अहवालामध्ये एकनाथ खडसे यांच्यावर ठपका असल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, ‘झोटिंग कमिशनचा अहवाल अद्यापि सरकारपुढे आला नाही. मग अहवालात ठपका आहे, असे तुम्हाला कोणी सांगितले? वेगवेगळ्या बातम्या पसरविल्या जातात. अहवाल आल्यानंतर त्यामध्ये काय म्हटले आहे, हे समोर येईल.’
प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या बैठकीत नेते बोलत असतात. परंतु महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही एक आहोत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याशी आमची चर्चा होते. महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही सगळे एक आहोत,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ‘मराठा आरक्षणासंदर्भात संसद अधिवेशनात काय होतेय, हे बघावे लागेल. असेही अजीत पवार म्हणाले.




























































