एकाच महिलेला किती पदं देणार? अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ संघर्ष उफाळला

विधान परिषदेसाठी अजित पवार गटाकडून सध्या तीन नावांची चर्चा सुरू आहे. यातील एक नाव महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचेही आहे. मात्र रुपाली चाकणकर यांच्या नावाला अजित पवार गटातूनच विरोध होताना दिसत आहे. मनसेची साथ सोडत अजित पवार गटासोबत आलेल्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी यावर आक्षेप घेत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक खणखणीत पोस्ट शेअर केली आहे. यामुळे अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ असा संघर्ष उफाळून येताना दिसतोय.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागा गेल्या अडीच वर्षापासून रिक्त आहे. यापैकी 3 जागा अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता असून यावर आनंद परांजपे, रुपाली चाकणकर आणि सिद्धार्थ कांबळे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त येताच अजित पवार गटातील अंतर्गत वाद समोर आला. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातमीचा आधार घेत आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक रोखठोक पोस्ट शेअर करत एकाच महिलेला किती पदे देणार? असा सवाल केला.

अजितदादांच्या बॅनरवरून मुख्यमंत्री गायब! ‘लाडकी बहीण योजने’वरून महायुतीत वादाची ठिणगी

काय आहे पोस्ट?

रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, पक्षामध्ये इतरही महिला आहेत. त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा. इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल.”