
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, राज्य शासनाने 28 तारखेच्या आत यासंबंधी निर्णय घ्यावा अन्यथा बारामतीकरांचा संयम संपेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
सकल बारामतीकरांकडून आज बारामतीतील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. महिलांनी हातात फलक घेत अपघाती मृत्यूच्या घटनेकडे लक्ष वेधले. येत्या 28 तारखेला या दुर्घटनेला एक महिना पूर्ण होत आहे. हा अपघात संशयास्पद असून जनतेच्या मनात तीव्र दुःख, अस्वस्थता आणि अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यांनी आयुष्यभर राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले अशा नेतृत्वाचा असा आकस्मिक व अवेळी अंत होणे ही केवळ एक घटना नसून जनभावनांना हादरा देणारी बाब आहे. बारामतीकर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची कधीही न भरून येणारी हानी असून या दुःखातून सावरणे सर्वांसाठी अतिशय कष्टाचे होऊन बसले आहे. महाराष्ट्राचे विकासपुरुष असणारे अजितदादा यांचे पुढील विकासाचे मोठे पाऊल टाकण्यापूर्वीच संशयास्पदरीतीने विमान अपघातात अवेळी मृत्यू होणे ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी अविश्वसनीय असून याची सखोल चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे, अशी मागणी बारामतीकरांकडून केली गेली.































































