सध्या काही लोकांना शोबाजीची सवय झालीय; अजित पवार यांचा एकनाथ शिंदेंना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. पण, याआधी नेतेमंडळी एकमेकांकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. पण, सध्या जावं लागतं. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना ‘शोबाजी’ करण्याची सवय आहे. पूर्वी चित्रपटसृष्टीत राज कपूर ‘शो-मॅन’ होते, तसे काही ‘शो-मॅन’ आता झाले आहेत, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

अजित पवार आज श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव या ठिकाणी आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी सद्यस्थितीतल्या राजकीय मुद्दय़ांबरोबरच नेत्यांचं गणपती दर्शन यावर आपल्या स्टाईलने भाष्य केलं. आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी जातो, मात्र कॅमेरा घेऊन जात नाही, हे सांगतानाच अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावताना काही जण ‘शो-मॅन’ झाले आहेत, असे फटकारले.

 अशोकराव काँग्रेस सोडणार नाहीत

काँग्रेसचे आमदार फुटणार, याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील स्पष्ट केले की, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांची राजकीय भेट झालेली नाही. सध्या मीडिया काहीही बातम्या देत असते, ज्यात कोणतेही तथ्य नसते, असे म्हणत अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार नाहीत असे सांगितले.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत सध्या जे सुरू आहे, ते लोकशाहीला धरून सुरू आहे का, याचा विचार व्हायला हवा, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.