अजमेरला आलेल्या मुलीवर 2 महिने गँगरेप, एका आरोपीला कोरोनाची लागण

1255

राजस्थानातील अजमेर इथे एका अल्पवयीन मुलीवर गँगरेप झाला होता. या मुलीवर बलात्कार करणाऱ्या 3 पैकी एका आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. पोलिसांनी इतर आरोपींचेही घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्यांचे अहवाल येणं बाकी आहे. ज्या मुलीवर बलात्कार झाला होता ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झालं आहे.

नवी दिल्लीला राहणारी अल्पवयीन मुलगी अजमेर इथल्या दर्ग्यात प्रार्थना करण्यासाठी आली होती. लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच ती इथे प्रार्थनेसाठी आली होती. असगर अली नावाच्या एका रिक्षाचालकाने तिला आमीष दाखवून त्याच्या घरी नेलं होतं. तिथून त्याने रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या अंदरकोट भागातील दुसऱ्या घरात नेलं. तिथे त्याचे आणखी दोन मित्र होते. हे दोघेही जण बिहारचे रहिवासी असून मोहम्मद रफीक आणि हबीबुल्ला अशी या दोघांची नावे आहेत.

असगर आणि त्याच्या मित्रांनी या मुलीवर बलात्कार केला. लॉकडाऊन घोषित झाल्याने संचारबंदी आणि जमावबंदी लागू झाली याचा फायदा उचलत या तिघांनी 2 महिने या मुलीवर बलात्कार केला. पीडितेला या काळात मारहाणही केल्याचं उघड झालं आहे. या मुलीने कशीबशी या तिघांची नजर चुकवून एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठले. या मुलीची वैद्यकीय तसापणी केली असता ती गर्भवती असल्याचं उघड झालं आहे.

तीनही आरोपींना पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिसांनी तीनही आरोपींची कोरोनाची चाचणी करवून घेतली होती. त्यात एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. इतर दोन आरोपींचे अहवाल मिळणं अद्याप बाकी आहे. या आरोपींना पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आरोपींना विलगीकरणात कुठे ठेवायचं याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. पीडितेचीही कोरोनाची चाचणी लवकरच घेतली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या