
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
‘मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन’ अर्थात ‘एमआयएम’चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा गरळ ओकले आहे. आम्ही 25 कोटी आहोत, तुम्ही 100 कोटी आहात. 15 मिनिटांसाठी पोलीस हटवा, मग बघा मुसलमानांची ताकद! या धमकीचा ओवेसी यांनी करीमनगर येथील सभेत बोलताना पुनरुच्चार केला. धर्मांधांच्या झुंडीचे बळी होण्यापेक्षा ‘शेर’ व्हा असा सल्लाही त्यांनी मुसलमानांना दिला.
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013 मध्ये एका सभेत बोलताना देशातील हिंदूंचा खात्मा करण्याची उर्मट भाषा केली होती. हिंदू 100 कोटी आहेत, मुसलमान 25 कोटी आहेत. देशातील पोलीस फक्त 15 मिनिटे बाजूला हटवा आणि होऊन जाऊ द्या. बघू या कोणामध्ये किती दम आहे ते अशी दमबाजी त्यांनी केली होती. अकबरुद्दीन ओवेसी यांच्या या धमकीवजा भाषणाचे देशभर संतप्त पडसाद उमटले. ओवेसी यांना अटक झाली. या प्रकरणात सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
परदेशात उपचार घेऊन परतलेल्या अकबरुद्दीन ओवेसी यांनी करीमनगर येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी अक्षरशः विष ओकले. मॉब लिंचिंगच्या नावाखाली कशाला छळ सहन करता, मुसलमानांनो, शेर बना, असा सल्ला देतानाच त्यांनी जे घाबरतात त्यांना अधिक घाबरवले जाते. ते लोक माझ्या जिवावर उठले आहेत. पण मागे मी ‘15 मिनिटे द्या’ असे बोललो होतो. त्याची आठवण या लोकांनी ठेवावी अशी धमकीही त्यांनी दिली.

























































