पैशाचा पाऊस पाडण्यासाठी शिक्षक देणार होता तरूणाचा बळी

24

सामना ऑनलाईन । अकोला

अकोल्यात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. एका नागरिकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. सुधाकर सोळंके असे या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी अकोला पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत सुधाकर सोळंके सह त्याचे साथीदार शंकर मदनकार आणि अमोल चव्हाण यांना अटक केली आहे.

बुधवारी सोळंके याने रोशन भटकर यांच्या मोबाईल वर फोन करून “आपल्याला पंचवीस ते तीस वयोगटातील अविवाहित तरुण एका महत्वाच्या विधिसाठी पाहिजे. आपण त्याला वाशिम जिल्ह्यातील धनज या गावातील एका मांत्रिकाकडे घेऊन जाऊ. त्याबदल्यात तूला एक कोटी रुपये व मला एक कोटी रुपये मिळतील असे आमिष दाखवले होते. तसेच जो तरूण या विधिसाठी तयार असेल त्यालादेखील 50 लाख रुपये मिळतील”, असेही त्याने भटकर यांना सांगितले .

यामगे नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय भटकरला आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुरुषोत्तम आवारे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांनी खदान पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला. तसेच सुधाकर सोळंके याने मोबाईलवरून केलेले संभाषणही ऐकवले. त्यामुळे हा सर्व नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याच्ये पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शिक्षक सुधाकर सोळंकेलो ताब्यात घेतलं. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या सोळंकेला जेव्हा पोलिसांनी आपला हिसका दाखवला, त्यावेळी तो पोपटासारखा बोलू लागला. त्यातून हे पैशाचा पाऊस पाडण्यासाठी एका तरूणाचा बळी देण्याचे प्रकरण उघडकीस आले. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याचे साथीदार शंकर आणि अमोल यांना अटक केली मात्र ज्या मांत्रिकाकडे ते जाणार होते तो मांत्रिक फरार झाला आहे.

दरम्यान, या अगोदरही अकोल्यात आम आदमी पक्षाचा नेता मुकिम अहमद आणि एका मांत्रिकाची जादू महिनाभरापूर्वीच पैशाचा पाऊस पाडण्याच्या प्रकरणात हत्या झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या