आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

1045

आळंदी येथील यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आळंदीला येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधांचे नियोजन करण्यासंदर्भात आज विधानभवनातील उपसभापती दालनात बैठक पार पडली त्यावेळी डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उदय जाधव, नगरविकास विभागाचे उपसचिव स.ज. मोघे, आळंदीचे मुख्याधिकारी समीर भूमकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका जलनि:सारणचे कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे आदी उपस्थित होते.

आळंदी येथे दरवर्षी यात्रेकरू मोठ्या संख्येने येतात. यावर्षीही यात्रेकरूंची सुरुवात झाली आहे. त्यांना पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी व दि.१९ नोव्हेंबर 2019 पासून त्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. यात्रेकरुंची पाण्याअभावी कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी पाण्याचे नियोजन करणारी टीम तयार करून यात्रेकरूंना शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांनी समन्वयाने आवश्यक तितक्या टँकरने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश यावेळी उपसभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत अधिकचे स्वच्छता गृहे, वाढीव पोलीस बंदोबस्त, सुरक्षिततेसाठी माहिती कक्ष, मदत कक्ष अधिक लोकाभिमुख करावे, यासाठी पत्रके तयार करुन प्रसिध्दी द्यावी, शौचालयांची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, मोफत औषधोपचार, खाद्य तपासणी, किटकांचा होणारा प्रादुर्भाव, वृक्ष रोपण करणे, पर्यटन दृष्ट्या आळंदी शहरातील प्राचीन मंदिरे तिर्थक्षेत्र विकास आराखड्याची पूर्ण झालेली कामे याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांची नोंदणी करणे, विश्रामगृहांचे बांधकाम, लोणीकंद मरकळ येथून वाहतूक सुरु करण्यासाठी ग्रामीण पोलीस अधिक्षकांशी चर्चा करुन नियोजन करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या