
सामना प्रतिनिधी। अलिबाग
मुंबईमधील मलबार हिल परिसरातील कमला नेहरू उद्यानात असलेल्या ‘म्हतारीच्या बुट’ हा पर्यटकांचे व बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण आहे. या म्हतारीच्या बुटाची प्रतिकृती यावेळी अलिबागमध्ये सुरू झालेल्या अलिबाग पर्यटन महोत्सवामध्ये उभारण्यात आली आहे. पर्यटन महोत्सवात उभारलेला हा म्हातारीचा बूट पर्यटकांचा सेल्फी पॉईंट ठरला आहे.
अलिबाग नगरपालिका व रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग पर्यटन महोत्सवाचे आयोजन 22 ते 25 डिसेंबर या दरम्यान करण्यात आले आहे. अलिबाग पर्यटन महोत्सवात यावेळी फूड फेस्टिवल 2018 ची थीम घेतली आहे. त्यामुळे महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांना वेगवेगळ्या व्हेज व नॉन व्हेज खाण्याची चव चाखण्यास मिळणार आहे.
अलिबाग पर्यटन महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे तयार केलेला म्हातारीचा बूट. हा म्हातारीचा बूट बिवीएम टॉकीजचे सत्यजित दळी यांनी बनविला आहे. मुंबईमधील कमला नेहरू उद्यानात असलेल्या म्हातारीच्या बुटाची हुबेहूब प्रतिकृती कलाकारांनी बनवली आहे. म्हातारीच्या बुटाच्या वरच्या बाजूला सांताक्लॉज बसविण्यात आला आहे. या बुटाच्या शेजारी आकर्षक रोषणाई केली असल्याने रात्रीच्या वेळी त्याचे सौन्दर्य अजूनच खुलून दिसत आहे.सलग सुट्या तसेच नाताळ सुट्टी आली असल्याने अलिबागमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामुळे येणारे पर्यटकही या महोत्सवाला भेट देत आहेत. महोत्सवात बनविलेला म्हातारीचा बूट पाहून सर्वाना सेल्फीचा मोह आवरता येत नाही.
गेल्या वर्षी अलिबाग पर्यटन महोत्सवात सिंगापूर लायन प्रतिकृती बनविण्यात आली होती. त्यावेळीही सिंगापूर लायन प्रतिकृती पर्यटकांची सेल्फी आकर्षण ठरली होती. तर यावेळी बनवलेल्या म्हातारीच्या बुटाची प्रतिकृती सुद्धा पर्यटकांचे आकर्षण ठरणार हे नक्की.






























































