अपस्मार.. कारणे.. लक्षणे.. आणि उपचार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विवेक गाडगीळ (मेंदू विकारतज्ञ)

आज जागतिक अपस्मार निवारण दिन आहे. फिट्स येणे, आकडी येणे या शब्दांनीही आपण घाबरून जातो. पण योग्य उपचार आणि काळजी यामुळे हा विकार नियंत्रणात राहू शकतो.

मन मनास उमगत नाही.. आधार कसा शोधावा.. मेंदू आणि मन .. दोन्ही एकमेकांत गुरफटलेले.. दोन्हींमध्ये संतुलन राखणे ज्याला शक्य झाले.. तो आयुष्याची अर्धी लढाई जिंकला.. काहींना हे सहज जमते.. तर काहींना हे जमविण्यात आयुष्य खर्ची जाते.. पण जेव्हा मन अस्थिर होते.. निराशेच्या विळख्यात सापडते तेव्हा मात्र मेंदू आणि मन या दोन्हीवर विपरीत परिणाम होऊ लागतो..यातून अनेक विकारांना सामोरे जावे लागते. अपस्मार.. एपिलेप्सी.. बोली भाषेत फीट किंवा आकडी येणे.. हे शब्द जरी ऐकले तरी मन घाबरून जाते.. मनाच्या गुंत्यातून हा विकार जडतो.. फक्त माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही या मनोविकारास सामोरे जावे लागते.. विशेषत: घरात पाळलेल्या डॉगीजना.. कारण एकाकीपणा हे या मनोविकारामागचे महत्वाचे कारण असते.

फीट येणे म्हणजे काय..?

आपण अनेकदा पाहतो कि एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडते.. थरथरायला लागते.. तिच्या तोंडून फेस येऊ लागतो..शरीराच्या विचित्र हालचाली करू कारते.. वेड्यावाकड्या अवस्थेत चक्कर येऊन खाली पडते. या विकारास फीट येणे किंवा एपिलेप्सी म्हणतात. प्रत्येकवेळेस चक्कर उन लागून किंवा अति श्रमानेच येते असे नव्हे तर एपिलेप्सी हे त्यामागील महत्वाचे कारण असू शकते. अपस्मार हा चेतासंस्थेचा आजार आहे. मनोविकाराच्या तीव्रतेनुसार रुग्णास अपस्माराचे झटके येत राहतात. जन्मत:च मेंदूत असणारा एखादा दोष, डोक्याला झालेली गंभीर इजा किंवा सततचा मानसिक तणाव.. धक्का यामुळे हा विकार जडू शकतो. हा विकार कोणत्याही वयात होऊ शकतो. अनेकदा लहान वयात मुलांमध्ये असणारा हा आजार वेळीच उपचार न केल्यास पुढे वाढत जातो. या आजारात येणाऱ्या फिट्स टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण ठेवता येते.

लक्षणे –

  • रुग्णाचा अचानकपणे शरीराचे संतुलन ढळते. अशक्तपणा येतो. व तोल जाऊन बेशुद्ध पडतो.
  • शरीर वेडेवाकडे होते, झटका येतो.
  • दातखीळ बसते.
  • तोंडातून फेस येऊ लागतो.
  • रुग्ण डोळे फिरवतो.

या साऱ्याचा कालावधी एक ते तीन मिनिटाचा असतो. वारंवार असे झटके येऊ लागल्यास आणि त्यांचा कालावधी वाढल्यास मेंदूला इजा होऊ शकते. शिवाय भान हरपून पडल्याने शारीरिक इजाही होऊ शकते.

फिट्स येण्याची कारणे –

मानसिक ताण तणाव हे कोणत्याही विकाराचे प्रमुख कारण आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात, पुढे जाण्याच्या इर्ष्येत मानसिक ताण हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे. यातूनच अपूर्ण राहणारी झोप, सतत वाढता रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास, स्त्रियांच्या मासिक पालीच्या वेळेस, वेदनाशामक गोळ्या, anti depressant  च्या अतिरेकामुळे, डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे, हा विकार असताना कडक उन्हात फिरल्यामुळे फिट्स येण्याची शक्यता वाढते.

हे आहेत उपचार –

तज्ञ डॉक्टरांकडून अपस्माराचे निदान झाल्यानंतर आधी औषधे सुरु केली जातात. औषधांनी जर आजार नियंत्रणात येत नसेल  तर मेंदूवरील सोपी, सुटसुटीत शस्त्रक्रिया करून फिट्स नियंत्रणात ठेवता येतात.

घरगुती उपचार –

  • डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत
  • नियमित तपासणी करून घ्यावी.
  • पुरेशी झोप.
  • मन शांत ठेवण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
  • नियमित व्यायाम करावा.
  • चहा, कॉफी, सिगारेट, मद्य यांचे सेवन करूच नका.
  • रुग्णाने नेहमी आपल्या खिशात किंवा आपल्या पर्समध्ये आपले नाव, पत्ता, फोन नंबर लिहलेली चिट्ठी ठेवावी.

फिट्स आल्यास काय करावे?

  • एखाद्या व्यक्तीस झटका आल्यास आपण शांत राहावे, घाबरून जाऊ नये.
  • फीट आलेल्या रुग्णास जबरदस्तीने हलवू नये.
  • रुग्णाला इजा पोहोचतील अशा वस्तू दूर कराव्यात.
  • रुग्णाला डाव्या किंवा उजव्या बाजूस वळवावे त्यामुळे त्याच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडून जाईल.
  • त्यानंतर रुग्णाला पाठीवर झोपवावे. व त्याच्या डोक्याखाली उशी ठेवावी.
  • रुग्णाचे तोंड उघडण्यासाठी तोंडात जबरदस्तीने चमचा किंवा तत्सम वस्तू घालू नये.
  • रुग्णाला फीट आल्यानंतर चप्पल, कांदा अजिबात हुंगवू नये. यांच्या उग्र वासाने रुग्ण भानावर येतो असा उगाच एक गैरसमज आहे. यामुळे नाही तो संसर्ग मात्र होऊ शकतो.
  • तोंडात पाणी घालू नये. पाणी श्वासनलिकेत गेले तर न्युमोनिया होण्याची शक्यता असते.
  • घट्ट कपडे सैल करावे.