
यंदाच्या पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय राखावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत दिल्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. बैठकीस मनपा आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, पूरपरिस्थितीत विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा तयार करावा. त्यानुसार कामे होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचे आदेश निर्गमित करावेत. पूरबाधित होणाऱ्या गावात जाऊन सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास बाधितांचे आणि जनावरांचे स्थलांतर याबाबत नागरिकांना माहिती देण्यात यावी. बाधित लोकांच्या स्थलांतराच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. निवारा केंद्रांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करावा. पूरपरिस्थितीचा मुकाबला करता यावा, यासाठी यंत्रणांनी जून व जुलैमध्ये मॉकड्रील घ्यावे. मॉकड्रीलमध्ये सर्व यंत्रणांचा सहभाग राहील, याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या.
1 जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करा
डुडी म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात एक जूनपासून नियंत्रण कक्ष कार्यरत करावा. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्याबरोबरच कक्ष 24 तास कार्यान्वित राहील, याची दक्षता घ्यावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने धूरफवारणीसह आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा. विद्युत वितरण कंपनीने खराब ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून घ्यावेत. मोठय़ा पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा.
नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पथके
पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाने पथके गठीत करून ठेवावीत. मान्सूनमध्ये करण्यात येणारी कामे व अन्य सर्व बाबींचा दर पंधरा दिवसांनी उपविभागीय अधिकारी यांनी आढावा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.






























































