
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महिन्यात पक्षाचे होणारे शिबीर व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळेच पक्षाने नियोजित शिबीर व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होईल असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये असा निर्णय झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री जिह्यात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील. पक्षांतर्गत होणाऱया निवडणुकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय आगामी ज्या निवडणुका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली आहे, असेही नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे – नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते
ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नको
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील अशीही बैठकीत चर्चा झाल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
























































