चारा छावण्यासाठी सर्व पक्षीय धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

जनावरांच्या चारा छावण्या चालवण्यासाठी आलेल्या प्रत्येक प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी या साठी काल भाजप वगळता सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या दालनात सुरु केलेले धरणे आंदोलन कोणताही अंतिम तोडगा न निघाल्याने आज दुसऱ्या दिवशीही सायंकाळी उशिरा पर्यंत सुरूच होते. आज या आंदोलनात केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे व राहुरी चे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे सहभागी झाले आहेत. करंजी येथे आणखी एका छावणीला मान्यता द्यावी हा प्रश्न आंदोलकांनी प्रतिष्टेचा केल्याने महसूल प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

छावण्या चालवण्यासाठी तालुक्यातून १०४ प्रस्ताव दाखल झाले असून त्या पैकी दोन छावण्या चालवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. प्रस्ताव दाखल केलेल्या सर्व संस्थांना छावणी चालवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत काल बुधवार दि. २० रोजी जी.प. सदस्य अनिल कराळे, शिवशंकर राजळे, रफिक शेख, अमोल वाघ आदी कार्यकर्त्यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनात धरणे आंदोलन सूरु केले होते. काल या विषयावर तोडगा न निघाल्याने सर्व कार्यकर्ते रात्री तहसील कार्यालयाच्या इमारतीत झोपून राहिले तर आज कार्यालय सुरु झाल्यावर त्यांनी पुन्हा पाटील यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरु केले.

या आंदोलनात आज ढाकणे, तनपुरे आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले. या वेळी करंजीसह त्या परिसरातील आणखी तीन छावण्यांना तातडीने परवानगी देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केल्या नंतर हे सर्व प्रस्ताव वरिष्ठ कार्यलयाला पाठवण्यात आले असून ते मंजूर होऊन आल्या नंतर परवानगी देऊ अशी भूमिका पाटील यांनी मांडली मात्र तातडीने प्रस्ताव मंजूर होऊन आल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. या विषयावर ढाकणे यांनी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांचेशी चर्चा केली मात्र करंजी येथे अगोदर एक छावणी चालवण्यास परवानगी दिली असताना दुसरी परवानगी देता येणार नाही असे पाटील यांनी सांगितल्या नंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रताप ढाकणे व प्राजक्त तनपुरे यांनी नगरला जाऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेत ते नगरला रवाना झाले तर उर्वरित कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन चालूच ठेवले या विषयावर सायंकाळी उशिरा पर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलन सुरूच होते.