
मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी काहीच कारवाई न करणाऱया निवडणूक आयोगाविरुद्ध मुंबईत 1 नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या अंतिम नियोजनासाठी उद्या दुपारी साडेबारा वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तसेच डाव्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
1 नोव्हेंबरचा मोर्चा विराट आणि अभूतपूर्व असाच होणार आहे. तो केवळ विरोधी पक्षांचा नाही तर मतदार यादीतील घोळाचा निषेध करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा असणार आहे. मोर्चाचे योग्य नियोजन व्हावे, सर्वांमध्ये समन्वय रहावा, यादृष्टीने उद्याची बैठक बोलवण्यात आली आहे.
संयुक्त पत्रकार परिषद होणार
पक्षपातळीवर आणि संयुक्तरित्या या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू आहे. उद्याच्या बैठकीत मोर्चाच्या या तयारीचाही आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीनंतर सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल, अशी माहिती शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.
असा निघणार मोर्चा
संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही जगवण्यासाठी हा सत्याचा मोर्चा निघणार आहे. खोट्या मतदार यादीविरोधातील या मोर्चात सर्व खऱया मतदारांनी सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी 1 नंतर चर्चगेटच्या फॅशन स्ट्रिट येथून हा मोर्चा निघणार आहे.




























































