>> देवेंद्र भोगले
मुंबईतील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सुरक्षेतील हलगर्जी अजूनही कायम आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील शासनाच्या गोकुळदास तेजपाल (जी.टी.) रुग्णालयात प्रवेशाचे तीनही मार्ग असुरक्षित आहेत. तिथून कुणीही रुग्णालयात प्रवेश करून गुन्हा घडवून सहीसलामत बाहेर जाऊ शकतो. कारण या तीनही मार्गांवरून प्रवेश करणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी सुरक्षारक्षकच नसतात असे दिसून आले आहे.
जी. टी. रुग्णालय हे सर जे. जे. रुग्णालय समूहातीलच एक रुग्णालय आहे. वैद्यकीय अधीक्षक हे या रुग्णालयाचे प्रमुख असतात. मात्र या रुग्णालयातील अधीक्षक डॉ. चिखलकर यांच्याकडे जे. जे. रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुखपदही असल्याने दोन्ही ठिकाणी लक्ष देण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही आणि अधिष्ठातांच्या भेटीही कमी पडतात. परिणामी जी. टी. रुग्णालयाचा कारभार हा रामभरोसेच चालला आहे.
यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. चिखलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवासात असल्याने बोलता येणार नाही असे सांगितले. नव्या महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा प्रभार असलेले डॉ. सकपाळ यांनी मेंटेनन्सचा कालावधी संपल्याने डॉक्टरांच्या वसतिगृहातील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती दिली. मात्र आताच आपल्याकडे प्रभार आल्याने अधिक काही सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संवेदनशील मार्ग सुरक्षेअभावी बनले वर्दळीचे
जी. टी. रुग्णालयात प्रवेशासाठी मुख्य प्रवेशद्वार लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजूला आहे. दुसरा मार्ग पासपोर्ट कार्यालयाकडून रुग्णालयात येतो आणि तिसरा गेट हा डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळ आहे. या तीनही मार्गावरून कुणीही आत येऊ आणि जाऊ शकतो. पासपोर्ट कार्यालयाकडील मार्गावर सुरक्षारक्षकच नसतात, असे येथील निवासी डॉक्टरांकडून समजते.
मेकॅनिकनेच चोरून नेले सीसीटीव्हींचे चार्जर्स
जी. टी. रुग्णालयात सध्या असलेले सुरक्षारक्षक किती काम करतात हा संशोधनाचा विषय बनला आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका चोरटय़ाने सीसीटीव्ही दुरुस्तीच्या कामासाठी आल्याचे सांगून ओपीडीतील सीसीटीव्हींचे चार्जर्स चोरून नेले होते. सीसीटीव्ही चालू कसे नाहीत हे जेव्हा समजले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला होता.
हॉस्टेलमधील महिला डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाची सुरक्षा एका वॉचमेनवर अवलंबून आहे. वसतिगृहाच्या मजल्यांवर कुठेही सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत. या वसतिगृहांमध्ये महिला निवासी डॉक्टरही राहत असूनही प्रशासनाने वसतिगृहाच्या सुरक्षेकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. जी. टी. आणि कामा रुग्णालय मिळून नवीन वैद्यकीय महाविद्यालय झाले असून अजूनही तेथील कारभार जे. जे. समूहाकडे आहे. त्यामुळेच ही हलगर्जी होत असल्याचे सांगितले जाते.