जिल्हा परिषद प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दर महिन्याला 10 कोटी रुपये मिळवून देण्याची खुली ऑफर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना दिली होती. तसा खळबळजनक गौप्यस्फोट खुद्द पालकमंत्र्यांनीच केला आहे. याचा अर्थ यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोटय़वधीचा भ्रष्टाचार चालू दिला होता असाच होतो. तसेच त्या अधिकाऩयाची बदली करण्याऐवजी गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला निलंबित का केले नाही? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केला.
येथील विजय भवन येथे नाईक बोलत होते ते म्हणाले, जिल्हा परिषदेतील त्या अधिकाऩयाने पालकमंत्र्यांना 10 कोटी रूपये मिळवून देण्याची ऑफर दिल्यानंतर, पालकमंत्र्यांनी त्या अधिकाऩयाची बदली करून त्याचे दुकान बंद केले. तसेच जाहीरपणे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. त्यावरून याआधीचे पालकमंत्री नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर, आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या अधिकाऩयाचे दुकान सुरु ठेवले होते असाच अर्थ निघतो.