
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी यांच्यासाठी 6 मार्च हा दिवस दुहेरी आनंदाचा ठरला. या जोडप्याने आपल्या सुखी संसाराची 15 वर्षे पूर्ण केली असतानाच लग्नाच्या या खास वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहासाठी एक अतिशय महागडी भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या 15 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनने स्नेहाला तब्बल 1.81 कोटी रुपये किमतीची आलिशान ‘मर्सिडीज-बेंझ AMG CLE 53’ कार भेट दिली. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन आणि त्याचे वडील अल्लू अरविंद हे स्नेहाला या नवीन कारच्या चाव्या सोपवताना दिसत आहेत. ही खास भेट पाहून भारावलेल्या स्नेहाने अर्जुनला प्रेमाने चुंबन घेतले आणि सासऱ्यांना मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला. त्यांच्या या प्रेमळ क्षणांनी चाहत्यांची मने जिंकली असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्नेहा रेड्डीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अल्लू शिरीषच्या लग्नातील काही सुंदर फोटो शेअर करत अर्जुनसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. तिने नमूद केले की, गेल्या 15 वर्षांत त्यांनी प्रेमाने भरलेले एक सुंदर जग, दोन मुले, पाळीव प्राणी आणि असंख्य आठवणींचे घर उभे केले आहे. तिने अर्जुनचे आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ दिल्याबद्दल आभार मानले आहेत. दुसरीकडे, अर्जुनने देखील स्नेहाला ‘क्यूटी’ म्हणत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या यशाचे सर्व श्रेय तिला दिले. दरम्यान, अभिनेत्री लक्ष्मी मंचूने देखील या जोडप्याची थट्टा करत अर्जुनने नक्की काय भेट दिली हे सांगण्यासाठी मिश्किल टिप्पणी केली.
अल्लू अर्जुन आणि स्नेहा 6 मार्च 2011 रोजी हैदराबादमध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना अयान आणि अर्हा ही दोन मुले असून अर्हाने ‘शाकुंथलम’ चित्रपटातून अभिनयात पदार्पणही केले आहे. व्यावसायिक आघाडीवर, अल्लू अर्जुन अलीकडेच ‘पुष्पा 2: द रूल’ मध्ये दिसला होता.

























































