
सामना ऑनलाईन, मुंबई
कोकणात गेले दोन दिवस सगळीकडे दाट धुक्याची चादर पसरते आहे. पहाटे 4.30 वाजल्यापासून ते सकाळी 10 वाजेपर्यंत हे धुके दिसत आहे. 70 मीटरपर्यंतच्या परिसरातील काहीच दिसत नसल्याने वाहने संथगतीने पुढे सरकत असल्याचे चित्र आहे. तापमान घसरल्यामुळे वातावरणात गारवा आहे. मार्च महिन्यापासून कोकणातही उन्हाचा पारा चांगलाच चढतो, परंतु अचानक तयार झालेले हे आल्हाददायक वातावरण कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरले आहे. या विचित्र हवामानामुळे पारा 30 डिग्री सेल्सियपर्यंत घसरला असला तरीही आंबा उत्पादकांना मात्र चांगलाच फटका बसणार आहे. धुक्यामुळे आंब्याच्या फुलावर दव तयार होत असून त्यातील पाण्यामुळे परागीकरणाला अडथळा निर्माण होणार आहे. परिणामी, मोहोर करपून जाणार असून मे महिन्यात येणारा हापूस यंदा बाजारात येणारच नाही, असे कोकणातील एका आंबा उत्पादकाने सांगितले.
































































