अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोडके सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. यानंतर सुलभा खोडके या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पाच आमदारांवर क्रॉस व्होटिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यामध्ये सुलभा खोडके यांचेही नाव असल्याची चर्चा होती. या चर्चेनंतर ज्या पाच आमदारांवर क्रॉस व्होटिंगचा ठपका ठेवला होता त्यांना उमेदवारी न देण्याचा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला. यामुळेच सुलभा खोडके यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू होती.