
सामना ऑनलाईन । श्रीनगर
अमरनाथ यात्रेसाठी सोमवारी पहिला जत्था जम्मू कश्मीरच्या बालताल आणि पहेलगामहून पवित्र गुहेकडे रवाना झाला आहे. या यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे सुमारे 40 हजार जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. या यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना बारकोड असलेली विशेष स्लिप देण्यात येत आहे. त्यामुळे गुहेकडे जाणाऱ्या आणि दर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर देखरेख ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे सुरक्षा दलाला सोपे होणार आहे.
अमरनाथसाठी रवाना झालेल्या पहिल्या जत्थ्यात बालतालहून 1617 आणि पहेलगामहून 2800 भाविक रवाना झाले आहेत. यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. तसेच यंदा भाविकांना बारकोड असलेली विशेष स्लिप देण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा दलाला भाविकावर देखरेख ठेवणे आणि सुरक्षेची व्यवस्था करणे सुलभ होत आहे.
या यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता गृह मंत्रालयाने वर्तवली आहे. या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी सुरक्षा दल सतर्क आहे. सीआरपीएफकडून नोंदणी झालेल्या भाविकांना बारकोड असलेली विशेष स्लिप देण्यात आली आहे. ही स्लिप दाखवून भाविक यात्रेसाठी बनवण्यात आलेल्या निवासी शिबिरापर्यंत अधिकृत वाहनाने पोहचू शकणार आहेत. ही योजना योग्य पद्धतीने राबवण्यासाठी अमरनाथ श्राईन बोर्ड आणि सुरक्षा दल मेहनत घेत आहेत. या स्लिपवर महत्त्वाच्या सूचना, भाविकांचे छायाचित्र आणि संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक अधिकृत वाहनावर रेडिओ टॅग लावण्यात आले आहेत. या वाहनातून भाविकांना निवासी शिबिरापर्यंत नेण्यात येणार आहे.
























































