
जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सुरू असलेले नोकरकपातीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. सध्या टेक कंपन्यासह अन्य मोठय़ा कंपन्यांमध्ये होत असलेल्या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्गांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण आहे. अनेकांना नोकरी जाण्याची भीती आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रसिद्ध अॅमेझॉन कंपनीने पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. कंपनीने अॅमेझॉन सुपरमार्केट चेन बंद करत असल्याचे सांगितल्याने या निर्णयामुळे अमेरिकेतील हजारो कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. अॅमेझॉन जवळपास 60 फ्रेश स्टोर्स बंद करत आहेत. यामुळे गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला हा किराणा उद्योग पूर्णपणे थांबेल.
‘बिझनेस इनसायडर’च्या अहवालानुसार, विविध राज्यांमधील ‘वॉरन’ (WARN) नोटिसींमधून या कपातीचे संकेत मिळाले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये याची तीव्रता अधिक असून, तिथे 20 स्टोअर्स बंद झाल्यामुळे सुमारे 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. 1 फेब्रुवारीपासून बहुतांश स्टोअर्स बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, मात्र कॅलिफोर्नियामधील स्थानिक कायद्यांमुळे तेथील स्टोअर्स मार्चच्या मध्यापर्यंत सुरू राहतील. कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसमोर कंपनीने दोन पर्याय ठेवले आहेत. कर्मचारी एकतर ‘सेव्हरन्स पे’ घेऊन नोकरी सोडू शकतात किंवा कंपनीच्या इतर विभागांत बदलीसाठी अर्ज करू शकतात.
विशेष म्हणजे, स्टोअर बंद झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना पुढील 90 दिवसांपर्यंत त्यांचे पूर्ण वेतन आणि सर्व लाभ मिळत राहतील. याचा लाभ कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल. या भरपाईची गणना कर्मचाऱ्यांची श्रेणी आणि गेल्या दोन महिन्यांतील त्यांच्या कामाच्या तासांच्या सरासरीवर केली जाणार आहे. जे कर्मचारी एप्रिलअखेरपर्यंत दुसरी भूमिका मिळवू शकणार नाहीत, त्यांना त्यांच्या सेवा कालावधीनुसार विशेष निवृत्ती पॅकेज दिले जाईल. यात दर सहा महिन्यांच्या कामासाठी एक आठवड्याचा पगार, किमान चार आठवडे आणि जास्तीत जास्त 20 आठवड्यांपर्यंतचा पगार दिला जाणार आहे. या आर्थिक तरतुदीमुळे नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे.



























































