देवदेवतांचा अपमान करणाऱ्या ‘तांडव’वरून अॅमेझॉन प्राईमने मागितली माफी

हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमवरील ‘तांडव’ ही वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या वेबसिरीजमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याबद्दल अॅमेझॉन प्राईमने माफी मागितली आहे.

अभिनेता सैफ अली खान याची मुख्य भूमिका असलेल्या तांडवमध्ये हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आल्याच्या आरोपामुळे वेबसिरिजच्या दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि अमेझॉन प्राइमच्या पंटेंट हेडविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. ‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी वेबसिरीजविरोधातील वाढता तणाव लक्षात घेत जाहीर माफी मागितली होती. मात्र, तरीही हा वाद काही थांबण्याचे चिन्ह नव्हतं.

या प्रकरणी उत्तर प्रदेशात गुन्हे दाखल झाल्यानंतर अमेझॉन प्राईमच्या हिंदुस्थानातील कंटेट चीफ असलेल्या अपर्णा पुरोहित यांची अटकपूर्व जामिनासाठीची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. ही याचिका फेटाळताना न्यायालयाने देवी-देवतांची खिल्ली उडविणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही असं म्हणत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.

आता, ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या अॅमेझॉन प्राइमनेही या प्रकरणी प्रेक्षकांची माफी मागितली आहे. प्राईमतर्फे एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. आम्ही प्रदर्शित केलेल्या तांडव या वेबसिरीजमध्ये काही दृश्य प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटली. आमचा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. आता ती आक्षेपार्ह दृश्यं वगळण्यात आली असून ती वेबसिरीजमध्ये दिसणार नाहीत. आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या भावनांचा सन्मान करतो आणि त्यांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांची मनापासून क्षमा मागतो, असं या पत्रकात अॅमेझॉनने स्पष्ट केलं आहे.

काय आहे प्रकरण?
काही लोकांनी या वेबसिरीजवर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या सिरीजमधल्या एका सीनमध्ये अभिनेता मोहम्मद जीशान अयूब हा भगवान शंकराच्या वेषात दिसत आहे. त्या प्रसंगामध्ये भगवान श्री राम व शिव शंकरावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. या गोष्टीवरुन चाहत्यांमध्ये नाराजी पसरली.

आपली प्रतिक्रिया द्या