भाजपचे धंदो प्रथम, पण स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे मिंधे कुठे आहेत? अंबादास दानवे यांचा सवाल

पाकिस्तानसोबत आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यास आपला आक्षेप नाही असे विधान केंद्रीय क्रिडामंत्री मनसूख मांडविया यांनी केले आहे. त्यावर भाजपचे धंदो प्रथम हे धोरण आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार मिंधे गँग कुठे आहे असा सवालही अंबादास दानवे यांनी विचारला.

अंबदास दानवे यांनी एक बातमी शेअर करत एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, देश विसरला नाही पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पहलगाम हल्ल्याचा विसर पडला दिसतो. पाकिस्तानसोबत खेळण्याचे वक्तव्य करून भाजपने ‘धंदो प्रथम’ हे आपले धोरण स्पष्ट केले आहे.

तसेच प्रश्न हा आहे की भाजपची ब शाखा अर्थात मिंधे गॅंग, जी स्वतःला मा. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणते, ती कुठे आहे! त्यांना हे पाक प्रेम दिसत नाही का, शिवसेनाप्रमुखांच्या कोणत्या विचारांत हे खेळणे बसते हे ही एकनाथ शिंदे
यांनी सांगावे.

तसेच आमचा इशारा स्पष्ट आहे, पाकिस्तानसोबत कोणत्याही खेळाच्या स्पर्धा नकोच. आमचे धोरण स्पष्ट आहे. निदान महाराष्ट्रात तरी हे असले सामने आम्ही होऊ देणार नाही असेही अंबादास दानवे म्हणाले.