शेतकऱ्यांची झाली, आता खेळाडूंची उपेक्षा; पदके नाही, ‘रम्मी’कडूनच बक्षिसांची अपेक्षा! अंबादास दानवेंचा कवितेतून सरकारला टोला

विधिमंडळामध्ये मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते. विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र फडणवीस सरकारने त्यांना फक्त समज दिली आणि कारवाई करण्याऐवजी कोकाटे यांचे खाते बदलले. कोकाटे यांच्याकडे क्रीडा खात्याचा कारभार तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर सरकारवर टीकेचा भडिमार होत असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कवितेतून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

माणिकराव कोकाटे रमीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी त्यांना आपल्या भेटीसाठी बोलवून कडक शब्दांत तंबी दिली होती. परंतु सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेतला नव्हता. मात्र खातेबदलाची शिक्षा त्यांना दिली आहे. सभागृहाच्या कामकाजातही देहभान हरपून रमी खेळणाऱया कोकाटेंकडे रात्री उशिरा क्रीडा खात्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना काढत जाहीर करण्यात आले. यानंतर अंबादास दानवे यांनी एक कविता आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर शेअर केली.

कारवाई नाहीच; फक्त खाते बदलले; ‘रमीपटू’ कोकाटे क्रीडा मंत्री, कृषी खात्याची जबाबदारी भरणेंकडे

विकूनी टाका खेळणे भंगाराच्या गाडीवर, नवे मंत्री देणार पत्त्यांचे कॅट आता डझनावर.. शेतकऱ्यांची झाली, आता खेळाडूंची उपेक्षा, पदके नाही, ‘रम्मी’कडूनच बक्षिसांची अपेक्षा.. माफी मागा पुन्हा बरळा, हा फंडा चांगलाय, डर कशाला कोणाचा, बॉस वर्षा बंगल्याबर बसलाय.. वेडे-वाकडे बोलणे-वागणे टिकवी मंत्र्यांचा ‘ताज’, आता नको मैदान, रम्मी खेळायला बसा महाराज, अशी कविता दानवे यांनी शेअर करत सरकारवर टीका केली.

आता महाराष्ट्र जंगली रमीत थांबणार नाही!

‘महाराष्ट्राचा अधिकृत राज्य खेळ म्हणून जंगली रमीला मान्यता मिळाली तर हरकत नको. नाहीतरी नवीन क्रीडामंत्र्यांच्या तो आवडीचा खेळ आहे. दिवसातील बराच काळ ते याचा सराव करतात. तसेही राज्य सरकारकडे रोजगार निर्मितीकरिता काही अजेंडा नाही. या माध्यमातून कमाई करण्यासाठी मंत्री स्वतः जनतेचे प्रशिक्षण वर्ग घेऊ शकतात. आणि जर पैसे गेले तर..तर आधी शेतकरी आत्महत्या होत होत्या, आता इतर करतील! नाही का? आता महाराष्ट्र जंगली रमीत थांबणार नाही’, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.