
हिंगोलीसह राज्यभरात पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महायुती सरकारला आणि त्यांच्या पालकमंत्र्यांना शेतकरी आणि जनतेशी काही देणे घेणे नाही. हे सरकार म्हणजे गुत्तेदार, कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या कमिशनमध्ये अडकलेले असल्याचा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी बैलपोळा सणाच्या दिवशी शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गांगापूर व वाकोडी सर्कलमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले. यावेळी ते बोलत होते.
मागील काही दिवस संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, तूर, हळद, केळी आदी पिके आडवी झाली आहेत. शेतकऱ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही सरकार व त्यांच्या पालकमंत्र्यांना याचे काही देणे घेणे नाही. हे सरकार म्हणजे गुत्तेदार, कॉन्ट्रॅक्टर व कमिशनमध्ये अडकलेले सरकार असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.
जिल्हा प्रशासनाने संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे बनले असल्याचे त्यांनी सांगितले. अंबादास दानवे यांनी पुराच्या पाण्यातून बाहेर काढलेल्या काही नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आम्ही चार दिवस पुराच्या पाण्यात अडकलेलो असताना आम्हाला कोणतीही मदत लवकर मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी हिंगोली-नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हासंघटक बालासाहेब मगर, शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे, उपजिल्हा संघटक शंकर घुगे, जिल्हा प्रवक्ता विठ्ठल चौतमल, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, सखाराम उबाळे, जनसंपर्क अधिकारी विष्णू भोजे, कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे आदी उपस्थित होते.