
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी विधान भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला. गिरणी कामगारांचा मोर्चा आणि शिक्षकांच्या मोर्चाबाबत बोलताना दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.
”आज मुंबईत जवळपास दीड लाख गिरणी कामगारांच्या मागणीसाठी एक भव्य मोर्चा होणार आहे. मुंबईत घरं मिळाली पाहिजे या साठी हा मोर्चा होणार आहे. सरकार या गिरणी कामगारांना मुंबईपासून लांब घरं देऊ पाहतंय. ते स्वीकारलं नाही तर तुमचा घरांवर हक्क राहणार नाही अशी दमबाजी करत आहेत. चढ्ढा प्रायव्हेट लिमिटेड बिल्डर आहे त्याची घरं विकण्यासाठी, त्याचे खिसे भरले जावे म्हणून ही घरं सरकार मिल कामगारांवर थोपवत आहे व त्यांना मुंबई बाहेर पाठवलं जातंय. मुंबई व गिरणी कामगार असं एक अतुट नातं आहे. ते कधीही, कोणत्याही सरकारला तोडता येणार नाही. त्यामुळे आझाद मैदानावरत्यांचा जो मोर्चा आहे त्यात आम्ही सगळे सहभागी होणार आहेत. या प्रश्नाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय. आझाद मैदानावरच शिक्षक उपोषणाला बसले आहेत. ज्या सरकारने टप्पा अनुदानाबाबत स्वत: अध्यादेश काढला आहे. आता त्या मागणीसाठी शिक्षकांना आंदोलन करावं लागत आहे. करा ना टप्पा अनुदान वाढ. पण हे सरकार दिवाळखोरीत निघाले आहे, एक एक पैशासाठी मोहताज झाले आहे. ऋण काढून सण करण्याचं काम सुरू आहे. कर्ज काढून महाराष्ट्राला कर्जात डुबवण्याचं काम सरकार करत आहेत, असे अंबादास दानवे म्हणाले.