बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरलेला असतानाच बुधवारची सकाळ तशाच एका भयंकर घटनेने झाली. अकोल्यातली एका शाळेत एका नराधम शिक्षकाने सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे. धक्कादायक म्हणजे हा शिक्षक या मुलींना आधी अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारत त्यांचा राजीनामा मागितला आहे.
”’लाडक्या बहिणीं’च्या लेकीने किती छळ सोसायचा? बदलापूर पाठोपाठ अकोल्यातील काजीखेड गावात एका शिक्षकाने सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. कायद्याचा धाक उरला आहे का या राज्यात? सरकारने ‘फडतूस’गिरी बंद करावी आणि राजीनामा द्यावा, अशी पोस्ट शेअर करत अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.
मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या आंदोलनानंतर अंबादास दानवे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, रेल्वे पोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
लाडकी बहीण फक्त पोस्टर्सवर सुरक्षित ठेवणारे खोके सरकार प्रत्यक्षात बहिणींची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर या सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास विलंब केल्यामुळे हा जनआक्रोश उफाळून आला. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात धाव घेऊन रेल रोको केला. या आंदोलनकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा योग्य नव्हता. हे आंदोलन फक्त आता बदलापूर पुरते मर्यादीत राहिलेले नसून उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर छेडण्यात येणार आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.
शिवसेनेच्या वतीने लालबागमध्ये आज जनआक्रोश आंदोलन
बदलापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभेच्या वतीने बुधवारी सकाळी 11 वाजता सेंट्रल पाईंट, भारतमाता सिनेमा समोर, लालबाग येथे जनआंदोलन छेडण्यात येणार आहे. शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात शिवडी विधानसभेतील वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, शाखाप्रमुख, युवासेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक सहभागी होणार आहेत.