शेतकऱ्यांना हे सरकार कधीच प्राधान्य देत नाही, अंबादास दानवे यांचा आरोप

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत (Chief Minister’s Assistance Fund) जमा झालेल्या निधीच्या खर्चावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर फडणवीसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. त्यावर प्रत्युत्तर देताना ”या सरकारने शेतकऱ्यांना कधीच प्राधान्य दिलं नाही, फक्त त्याचा आव आणला’, असा आरोप केला आहे.

”शेतकरी सहाय्यता निधीला अनेक लोकं मदत करत असतात. अब्जावजी रुपये येत असतात. माहितीच्या अधिकाराखाली आमच्या एका मित्राने माहिती घेतली तेव्हा समोर आले की या निधीतून ऑक्टोबर महिन्यात फक्त 75 हजार रुपये खर्च केले आहेत. फडणवीसांच्या कार्यालयाने यावर जे स्पष्टीकरण दिले त्याचे मी स्वागत करतो. तुमच्याच कार्यालयातून अशाप्रकारे कारभार चालतो. त्यावर कारवाईची अपेक्षा मी पण करतो. पण या निधीतून शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला पाहिजे. पुर्नवसनातून शेतकऱ्यांसाठी 31 हजार 800 कोटी जाहीर केले होते. मात्र आतापर्यंत खर्च झाले 14 हजार कोटी. बरं झालं हे तुम्ही स्वत: मान्य केले. तुमच्या काळात जाहीर झालेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार तुम्ही सव्वा सहा लाख शेतकऱ्यांचे साडे पाच हजार कोटी रुपये देणं बाकी आहे. कोर्टाने आदेश दिलाय. त्या योजनेसाठी तुम्ही पुरवणी मागण्यातून तुम्ही 500 कोटींची मागणी करता. साडे पाच हजार कोटी कुठे आणि पाचशे कोटी कुठे. आपण शेतकऱ्यांना कधीच प्राधान्य देत नाही. फक्त त्याचा आव आणता. हा माझा आरोप आहे. अन्य वेगवेगळे अनुदान बाकी आहेत. शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचे साडेपाच हजार कोटी रुपये लवकरात लवकर मिळाले पाहिजेत, असे अंबादास दानवे म्हणाले.