
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये अद्याप दाखल करण्यात आलेले नाही. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावत पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये का नाही? असा सवाल केला होता. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
”पुण्यातील जमीन प्रकरण हे बहुदा पहिलेच असे प्रकरण मी पाहिले ज्यात ‘आरोपींच्या सोयी’ने चौकशीचा फार्स सुरू आहे. पत्र-पत्र खेळण्याची कारणे आजही संपतील, याची शक्यता शून्य वाटते. न्यायालयाने ऐकवल्यावरही ९९ टक्के भागीदार असलेल्या पार्टनरवर गुन्हा दाखल होत नाही. सरकार कोर्टच्या विशेष निर्देशांची वाट पाहत आहे का?, असा सवाल दानवे यांनी केला आहे.






























































