
विरोधी पक्षाच्या लोकांचा अपमान हा आपल्या महायुतीचा अजेंडा आहेच, आता सरन्यायधीश महोदयांना तरी त्या चष्म्यातून पाहू नका, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला फटकारले आहे.
महाराष्ट्राचे सुपुत्र व देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांचा रविवारी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन व इतर बार कौन्सिलच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून उघड नाराजी व्यक्त केली. यावरूनच आता दानवे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
X वर एक पोस्ट करत अंबादास दानवे म्हणाले आहेत की, “महाराष्ट्राचे सुपुत्र आज देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर बसल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉलप्रमाणे अधिकारी जात नाहीत. उलट त्यांना भाड्याची गाडी दिली जाते. कार्यपालिका, न्यायापालिकेच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे ते संविधान, या त्यांच्या वक्तव्याचा राग धरून तर त्यांना महाराष्ट्र सरकारने अशी वागणूक नाही दिली न देवेंद्र फडणवीसजी? विरोधी पक्षाच्या लोकांचा अपमान हा आपल्या महायुतीचा अजेंडा आहेच, आता सरन्यायधीश महोदयांना तरी त्या चष्म्यातून पाहू नका.”