राज्य कर्जबाजारी, तरीही विकासाचा पैसा लोकप्रिय योजनांकडे वळविला, अंबादास दानवे यांची सरकारवर टीका

‘महायुती सरकारच्या काळात राज्य कर्जबाजारी होत असून, विकासाचा पैसा लोकप्रिय योजनांकडे वळविला जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, विकासासाठी पैसे नाहीत, राज्यावर सात लाख 88 हजार कोटींचे कर्ज असून, सरकार लोकप्रिय योजनांकडे पैसे वळवू लागल्याने महाराष्ट्र विकासापासून कोसो दूर जात आहे,’ अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय बैठकीसाठी अंबादास दानवे आज पंढरपुरात आले होते. श्री विठ्ठलदर्शनानंतर ते माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकावर सडकून टीका केली.

मुख्यमंत्रिपदावरून त्यांना विचारले असता, ‘आधी महाराष्ट्राला लुटणारे सरकार तर जाऊ दे, मग नवीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय होईल,’ असे त्यांनी सांगितले. ‘ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री, असे होणे योग्य नसून, यामुळे पाडापाडीचे राजकारण वाढत जाते,’ असे सांगत, महाराष्ट्राला चांगले नेतृत्व देण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यात असल्याचे दानवे यांनी सांगितले. याबाबत आपण विठूरायाला साकडे घातल्याचेही त्यांनी सांगितले.

‘भाजप गेल्या वर्षीपासून राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली घडविण्याचा प्रयत्न करीत आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, शेवगाव, संगमनेर, कोल्हापूर येथे त्यांनी तसा प्रयत्न केला. मात्र, जनतेने त्यांना भीक घातली नाही,’ असा टोला दानवे यांनी लगावला.