Israel Iran News – हिंदुस्थानी दुतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी महत्त्वाची ॲडव्हायजरी जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणमधील 30 ठिकाणांवर भीषण हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने तातडीने पावले उचलत इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हिंदुस्थानी दुतावासाने जारी केलेल्या या ॲडव्हायजरीनुसार, सध्याची सुरक्षा स्थिती पाहता सर्व हिंदुस्थानी नागरिकांनी अत्यंत सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच इस्रायलचे स्थानिक अधिकारी आणि ‘होम फ्रंट कमांड’ द्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सुरक्षा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दुतावासाने हिंदुस्थानी नागरिकांना नियुक्त केलेल्या आश्रयस्थानांजवळ राहण्याचा सल्ला दिला असून, आपल्या निवासस्थानाच्या किंवा कामाच्या ठिकाणाजवळील सुरक्षित ठिकाणांची पूर्ण माहिती ठेवण्यास सांगितले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, स्थानिक बातम्या, अधिकृत घोषणा आणि आपत्कालीन सूचनांकडे सतत लक्ष ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.India Advisory to Israel people

कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी हिंदुस्थानी दुतावासाने 24 तास कार्यरत असणारा हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी केला आहे. तेल अवीवमधील हिंदुस्थानी दूतावासाशी तात्काळ संपर्कासाठी नागरिकांनी +972-54-7520711 या टेलिफोन क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधवा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.