
‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशी दवंडी पिटवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार केला होता. त्याच ट्रम्प यांनी हिंदुस्थानला आज मोठा धक्का देत हिंदुस्थानातून आयात वस्तूंवर 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. इतकेच नव्हे तर, रशियाकडून तेल व शस्त्रास्त्रs खरेदी केल्याबद्दल दंडही ठोठावला. 1 ऑगस्टपासून नव्या कराची अंमलबजावणी होणार आहे.
दुसऱयांदा सत्तेत आलेल्या ट्रम्प यांनी विविध देशांतून अमेरिकेत होणाऱया आयातीवर वाढीव टॅरिफ लादण्याचा धडाका लावला आहे. एप्रिलमध्ये त्यांनी हिंदुस्थानवरही 27 टक्के टॅरिफची घोषणा केली होती, मात्र दोन्ही देशांत नव्या व्यापारी कराराची बोलणी सुरू असल्याने त्यास स्थगिती दिली. ही बोलणी सुरू असतानाच ट्रम्प यांनी वाढीव टॅरिफ लादले. हिंदुस्थान हा सातत्याने रशियाकडून मोठय़ा प्रमाणावर तेल आणि शस्त्रास्त्रs खरेदी करतो. रशियाने युव्रेनमधील युद्ध थांबवावे अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांच्यावर दबाव वाढवण्याची गरज आहे. असे असतानाही हिंदुस्थान त्यांच्याशी व्यापार करतो. हे चांगले नाही. त्यामुळेच हिंदुस्थानला दंडही द्यावा लागेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
हे कसलं परराष्ट्र धोरण… मोदींच्या मैत्रीचे परिणाम देश भोगतोय!
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठली आहे. ‘मोदींच्या मैत्रीचे परिणाम देश भोगत आहे. मोदींनी अमेरिकेत जाऊन ‘अब की बार, ट्रम्प सरकार’ म्हणत त्यांचा प्रचार केला. त्यांना मिठय़ा मारल्या आणि आता ट्रम्पनी टॅरिफ लावला. सरकारच्या अपयशी परराष्ट्र धोरणाचे हे फळ आहे’, असा हल्ला काँग्रेसने चढवला. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा विजय असो, अशी उपरोधिक टीका सोशल मीडियातून होत आहे.
सरकार आता अभ्यास करणार!
ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेवर केंद्र सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमेरिकेने केलेल्या घोषणेचे नेमके काय परिणाम होणार याचा अभ्यास आम्ही करत आहोत. शेतकरी व उद्योजकांसह देशाच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील’, असे वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.
– हिंदुस्थान मित्र असला तरी वर्षानुवर्षे तो आमच्या वस्तूंवर अवाच्या सवा कर लावत आला आहे. अमेरिकी आयातीवर इतर कोणत्याही देशापेक्षा हिंदुस्थानात जास्त कर आहे, पण यापुढे तसे होणार नाही. आता मी अध्यक्षपदावर आहे, असे ट्रम्प म्हणाले.