
अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये रहदारीच्या रस्त्यावर छोटे विमान कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. विमानाचे इंजिन हवेतच निकामी झाल्याने हा अपघात झाला. यावेळी वैमानिकाने नियंत्रणाबाहेर जात असलेल्या विमानातून एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) अत्यंत भावूक निरोप दिला. “आम्ही वाचणार नाही, कृपया माझ्या पत्नीला सांगा की माझं तिच्यावर आणि पालकांवर खूप प्रेम आहे,” असा वैमानिक रॉजर्स यांचा थरकाप उडवणारा आवाज रेकॉर्डिंगमध्ये कैद झाला आहे.
गेन्सविले येथील ली गिलमर मेमोरियल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाचे इंजिन बंद पडले. वैमानिकाने विमान पुन्हा धावपट्टीवर नेण्याचा प्रयत्न केला, परंतु अंतर जास्त असल्याने त्यांना रस्त्यावरच इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. खाली उतरताना हे विमान अनेक वाहनांना धडकले. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात विमान रस्त्यावर घसरताना दिसत आहेत.
Small plane pilot said “tell my wife I love her” before making emergency landing and crashing into vehicles on a busy road
“Mayday!… We’re not going to make it. Please, tell my wife, Molly, I love her and my parents. I love them so much.”
A Hawker Beechcraft BE-36 made an… pic.twitter.com/jwemh2cboW
— Unlimited L’s (@unlimited_ls) February 10, 2026
या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानात वैमानिक रॉजर्स आणि एक विद्यार्थी असे दोघे जण होते, जे या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. वैमानिकाने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, इंजिन खराब झाल्यानंतर त्यांनी सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले, मात्र विमानतळापर्यंत पोहोचणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा कठीण निर्णय घेतला.
घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रस्त्यावरील रहदारीमुळे मोठा अनर्थ ओढवू शकला असता, परंतु वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे दोन प्रवाशांसह रस्त्यावरील नागरिकांचे प्राणही वाचले आहेत. सध्या या अपघाताचा अधिक तपास स्थानिक प्रशासनाकडून केला जात आहे.


























































