अमेरिकेत अवतरला ‘मिनी इंडिया’

613

‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमासाठी संपूर्ण ह्यूस्टन रविवारी हिंदुस्थानमय झाले होते. अमेरिकेत जणू ‘मिनी इंडिया’च अवतरला होता. ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडियममध्ये 400 कलाकारांचा बहारदार कार्यक्रम झाला. हिंदुस्थानी संस्कृतीचे सादरीकरण झाले. कीर्तनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. समोसा, भांगडा आणि गुरबाणीने पंजाबी संस्कृतीची झलक दाखवली. गरबा नृत्याने गुजरातची आठवण करून दिली. ‘एकला चालो रे…’म्हणत बंगाली कलाकारांनी आपली कला सादर केली. याबरोबरच संस्कृत श्लोकही उपस्थितांना ऐकायला मिळाले. अमेरिकेत राहणाऱया पन्नास हजारांवर हिंदुस्थानींना आपण आपल्याच मातृभूमीवर असल्याचा भास व्हावा असेच वातावरण होते.

हिंदुस्थानने जगाला योगासनांची देणगी दिली. त्या योगासनांची प्रात्यक्षिके यावेळी करण्यात आली. योगाचे महत्त्व सांगणाऱ्या बौद्ध धर्माचेही महत्त्व यावेळी विषद करून सांगण्यात आले. दिवंगत गझल गायक जगजीत सिंग यांच्या ‘झुकी झुकी सी नजर..’ या गझलच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. हिंदुस्थानी सतारवादकाचे सूर आणि तबल्याच्या तालावर अमेरिकन तरुणीने शास्त्रीय नृत्याची अप्रतिम झलक सादर केली. ‘वैष्णव जन तो’ या गीताने महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली.

पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी हिंदुस्थानी नागरिक उत्सुक होते. मोदी यांचे आगमन होताच एनआरजी स्टेडियम मोदी-मोदीच्या जयघोषाने दुमदुमले. उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आणि जयघोषात मोदी यांचे स्वागत केले. अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील खासदारांनी हस्तांदोलन करून मोदी यांना ‘वेलकम’ केले. शानदार स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडून ह्यूस्टनचे आभार व्यक्त केले गेले. ‘कीऑफ ह्यूस्टन’ सन्मान देऊन यावेळी मोदी यांचा गौरव करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या