मुंबई उच्च न्यायालयाने अमेरीकन फास्ट फूड कंपनी बर्गर किंगला अंतरीम दिलासा दिला आहे. पुण्यातील एका रेस्टॉरंटला ट्रेडमार्क उल्लंघनाच्या प्रकरणात 6 सप्टेंबरपर्यंत ब्रँडचे नाव वापरता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने रेस्टॉरंटला ब्रँड नेम वापरण्यास बंदी घातली आहे.
मागच्या आठवड्यात बर्गर किंगने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतून पुणे न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. पुणे येथील बर्गर किंग रेस्टॉरंटविरुद्ध ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पुणे न्यायालयाने खटला फेटाळून लावला होता. जिल्हा न्यायालयाने खटला फेटाळल्यानंतर बर्गर किंगने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
बर्गर किंगच्या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. चंदुरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने 26 ऑगस्ट 2024 रोजी सांगितले की, न्यायालयात 6 सप्टेंबरला कंपनीच्या अर्जावर सुनावणी केली जाईल. कंपनीने रेस्टॉरंटविरुद्ध अंतरिम मनाई हुकूम मागणारा अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज उच्च न्यायालयाने दाखल करत आता रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही.
फास्ट-फूड कंपनीने रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ नाव वापरण्यापासून रोखण्यासाठी खटलाही दाखल केला. कंपनीने सांगितले की, रेस्टॉरंट देखील बर्गर किंग नावाचा वापर करत आहे, ज्यामुळे कंपनीच्या व्यवसायाला तोटा बसत असून प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे.