
सामना ऑनलाईन। अमेठी
एका 64 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱयाची काही अज्ञात लोकांच्या टोळक्याने घरात घुसून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये उघडकीस आला. शनिवारी रात्री कमरोली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील गावामध्ये ही घटना घडली. अमानुल्लाह असे मृत लष्करी अधिकाऱयाचे नाव असून निवृत्त होण्यापूर्वी ते हिंदुस्थानी लष्करात कॅप्टन म्हणून सेवेत होते.
अज्ञात टोळक्याने लाकडी दांडक्यांच्या सहाय्याने अमानुल्लाह यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली. याबाबत बोलताना घटनेचा तपास करणारे सहायक पोलीस अधीक्षक दयाराम म्हणाले, ‘पोलिसांना अमानुल्लाह यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार अमानुल्लाह आणि त्यांची पत्नी हे दोघे घरात असताना अचानक काही अज्ञात लोकांचे टोळके घरात घुसले. या टोळक्याने लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी अमानुल्लाह यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
























































