
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत मुंबई अध्यक्ष म्हणून साटम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांची भाजप मुंबई अध्यक्ष पदाची मुदत संपली होती. त्यामुळे पक्षात मुंबईच्या नव्या अध्यक्षांची चर्चा सुरू होती. मुंबईच्या अध्यक्ष पदासाठी साटम यांच्यासह प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्या नावाची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित साटम यांच्या निवडीची घोषणा करीत त्यांना नियुक्तीपत्र देऊन पक्षातर्फे स्वागत केले.