
भाजप सत्तेवर आल्यानंतर केवळ पाच महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवणे शक्य झाले, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींचे कौतुक केले. विजयादशमी म्हणजे वाईटाची चांगल्यावर मात. अशीच मात आपल्याला या निवडणुकीत करायची आहे. त्यासाठी पुन्हा भाजपलाच निवडून द्या, असे आवाहनही अमित शहा यांनी केले. सावरगाव या ठिकाणी भगवानगडावर मंगळवारी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अमित शहा हे बीडच्या दौर्यावर आले होते. आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. वंचित समाजासाठी ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संकल्पना मांडली होती त्या संकल्पनेनुसारच मोदी काम करत आहेत, असेही शहा यावेळी म्हणाले. वंचित, शोषित आणि वंचित समाजासाठी भगवानबाबा यांनी सांगितलेल्या मार्गावर मोदी चालत आहेत. मोदी सरकारने ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा देण्याचे काम केले आहे. तसेच संविधानिक आयोगही बनवण्याचे काम केले आहे, असेही ते पुढे म्हणाले.
अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सीमोल्लंघन करायचंय – पंकजा मुंडे
2014 मध्ये अमित शहा हे भगवानबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आपल्याला हे सरकार लाभले. अमित शहा यांनी जेवढे सीमोल्लंघन केले आहे त्याहूनही सीमोल्लंघन त्यांच्याकडून यापुढे घडणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. देशात राष्ट्रभक्तीच सर्वांना एकत्र बांधू शकते. 370 च्या माध्यमातून राष्ट्रभक्ती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी 370 कलम हटवून न्याय मिळवून दिला असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद घेतला तेव्हा ते मला खूश रहा असे म्हणाले. तेव्हा मला कळले की, मतांपेक्षा लोकांच्या मनावर राज्य करणे किती महत्त्वाचे आहे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. ऊसतोड कामगारांसाठीही यापुढे पावले उचलायची असल्याचेही त्या म्हणाल्या.

























































