सरकार आणि न्यायालयाने पालन करता येतील असेच निर्णय द्यावेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । थिरूवनंतपूरम

न्यायालय आणि सरकारने आस्थेशी संबंधित व ज्याचे पालन करता येतील असेच निर्णय द्यावेत, असे आवाहन करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महिलांच्या मंदिर विरोधासाठी आंदोलन करणाऱ्या अय्यप्पा भक्तांवर कठोर कारवाई करणाऱ्या केरळ सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. कन्नूर येथील पक्ष कार्यालयाच्या उदघाटनासाठी आलेल्या शहा यांनी भाजप शबरीमाला भक्तांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचे आश्वासनहि दिले.

ज्या आदेशांचं पालन करता येईल, असेच निर्णय न्यायालय आणि सरकारने दिले पाहिजेत . लोकांच्या आस्थेला ठेच पोहोचवणारे आदेश देऊ नये. राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 चं नेहमीच उदाहरण दिलं जातं. तसेच अनुच्छेद 25 आणि 26 अन्वये धर्माचं पालन करण्याचा अधिकार असल्याचंही सांगितलं जातं. पण एक अधिकार दुसऱ्या अधिकाराच्या विरोधी कसा असू शकतो? हिंदू धर्माने कधीच परंपरेच्या नावाखाली महिलांवर अन्याय केला नाही. उलट त्यांना देवीचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली आहे, असेही प्रतिपादन भाजप अध्यक्ष शहा यांनी केले.

केरळ सरकारने अयप्पाच्या भक्तांवर दमनचक्र सुरू केलंय, पण भाजप या भक्तांच्यापाठी पहाडा सारखा उभा राहील. जर हे दमनचक्र थांबले नाही तर भक्त त्याला जशास तसे उत्तर देतील, असा इशारा देतानाच कम्युनिस्ट सरकार केरळमध्ये मंदिरांच्या परंपरा तोडण्याचं काम करत असल्याचा आरोपही शहा यांनी केला. शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिला प्रवेशाच्या न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन करणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर विरोधकांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. यामध्ये आश्रमातील काही वाहने समाजकंटकांनी पेटवून दिली आहेत. दरम्यान, या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा वैचारिकदृष्ट्या सामना करु शकत नाही तेव्हा असा प्रकारचे हल्ले केले जातात. स्वामी गिरी हे भगवतगीता स्कूलचे संचालक आहेत. तसेच त्यांनी शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे समर्थन केले आहे.केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष श्रीधरन पिल्लई, थाजोमन तंत्री आणि पंडलम रॉयल फॅमिलीचा या हल्ल्यामागे हात असल्याचा आरोप स्वामी गिरी यांनी केला आहे. लोकांना सत्य सांगण्याऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा यांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.